Breaking News

गुढीपाडवा आणि स्वातंत्र्याचा संकल्प!

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा. घराघरांवर आकाशाकडे झेपावणारी गुढी, भगवा ध्वज आणि झेंडूची तोरणे. भारतभूमीवरून आकाशतत्त्वाला स्पर्श करून दशदिशांना व्यापून टाकणारे उदात्त संकल्प करण्याचा दिवस.राष्ट्राची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता ह्याहून माणसाला दुसरे प्रिय काय असते?

आपल्यावर मोगलांनी इंग्रजांनी, काँग्रेसने राज्य केले. मोगलांनी ह्या देशाचे भावविश्व नाकारले. इंग्रजांनी हिंदूंना अराष्ट्रीय केले.काँग्रेसने त्याहून मोठा विश्वासघात केला.काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात अखंड भारताचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मुसलमानांना स्वातंत्र्य दिले. हिंदूंच्या स्वातंत्र्याचा करता येईल तेवढा संकोच केला. काँग्रेसने निर्माण केलेला पाकिस्तान आज इस्लामी आतंकवादाचे जगातील प्रमुख केंद्र आहे. आम्ही स्वातंत्र्य मिळविले असे ढोल काँग्रेस वेळोवेळो बजावते. म्हणून काँग्रेसने देशाची फाळणी केली आणि काँग्रेसने पाकिस्तान होऊ दिले असे म्हणण्याचा हिंदूंना हक्क आहे. एकाही हिंदूला फाळणी नको होती मग फाळणी झाली कशी, असा प्रश्न दिसेल त्या काँग्रेसवाल्याला विचारण्याचा हिंदूंना अधिकार आहे. हा देश हिंदूंचा नाही हे जगाला सांगण्यासाठी काँग्रेसने इतर संस्थाने झाली तसे काश्मीरला भारतात पूर्णपणे विलिन होऊ दिले नाही. काँग्रेसने काश्मीरला स्वतंत्र पंतप्रधान, स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र ध्वज दिला. मोदींच्या राज्यात महागाई आणि बेरोजगारी कमी झाली नाही, अशी ओरड केली जाते. राष्ट्र सुरक्षित आणि एकात्म असेल, तर सगळी ऊर्जा लोकांचे जीवनमान सुधारण्याकडे लावता येते. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने मुसलमानांना हिंदूंशी समरस होऊ दिले नाही. मुसलमानांची धर्मांधता वाढेल अशी पावले काँग्रेसने टाकली. काँग्रेसने हिंदूंमधील सर्व समाजघटकांना एकात्म होऊ दिले नाही. भांडणे मिटविली नाहीत तर वाढवली. मोगलांनी काही कामे केली असतील म्हणून त्यांचे राज्य आपले राज्य होत नाही. इंग्रजांनी रेल्वे आणली. आणखी सुधारणा केल्या. म्हणून इंग्रजांचे राज्य आपले राज्य होत नाही, तसेच काँग्रेसवाले ह्या देशातले असले, अगदी आपलेच असले, तरी काँग्रेसचे राज्य हे आपले राज्य होऊ शकत नाही. कारण काँग्रेसने भारताची सुरक्षितता, सार्वभौमता, स्वतंत्रता आणि एकात्मता ह्यांच्याशी खेळ केला. आज गुढीपाडवा. आपण खरेच स्वतंत्र झालो आहोत का ह्याविषयी चिंतन करण्याचा हा दिवस आहे. मोगल गेले, इंग्रज गेले, पण ते जसे वागत होते, तसेच काँग्रेस वागत आली. काँग्रेसने हा देश मजबूत केला नाही. मजबूर केला. ज्या देशाची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता दोलायमान असते तो देश भौतिक प्रगतीकडे सगळी ऊर्जा एकवटू शकत नाही. जगातील प्रत्येक सहावा माणूस हिंदू आहे. बुद्धिमत्ता आणि तंत्रकौशल्य ह्यात आपण जगात कोणालाही हार जाणार नाही. तरी आपण महासत्ता बनलो नाही. कारण आपण एकात्म नाही. स्वतंत्र असूनही पारतंत्र्यात असल्यासारखे खालमानेने आपण जगतो. आता हे बदलायचे आहे. विख्यात  विधिज्ञ आणि अर्थतज्ज्ञ नानी पालखीवाला ह्यांनी त्यांच्या ‘वुई दि नेशन’ ह्या ग्रंथात ‘फॉर्टीथ्री इयर्स ऑफ इंडिपेन्डेन्स’ ह्या लेखात व्यक्त केलेल्या त्यांच्या काही मतप्रदर्शनाचा स्वैर अनुवाद देत आहे. भारतीय प्रजासत्ताकाने आपल्या पहिल्या 40 वर्षात मानव संसाधनाच्या म्हणजे शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब नियोजन आणि पौष्टिक आहार ह्यात कमी गुंतवणूक केली. दगडविटात अधिक पैसा ओतला. म्हणून आपली संख्यात्मक वाढ झाली गुणात्मक झाली नाही. आपले सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले, पण सकल राष्ट्रीय समाधान वाढले नाही. परदेशात भारतीय मन लावून काम करतात आणि समृद्ध होतात. त्यांना पाहून तेथील समीक्षकांना नेहमी प्रश्न पडतो की एवढी चांगली माणसे आणि नैसर्गिक संपत्ती असताना भारत दरिद्री राहूच कसा शकतो? त्याचे उत्तर असे आहे की निसर्गाने आम्हाला दरिद्री नाही ठेवले. दारिद्य्राचा पाठपुरावा करणारा विशेषज्ञ म्हणून खरे म्हणजे भारताला ओळखले पाहिजे.आंतरराष्ट्रीय वित्त आयोगाचे उपाध्यक्ष सर विल्यम रिरी 1989 मध्ये भारतात होते. त्यांचे भारतीयांचे मूल्यमापन करणारे पुढील उद्गार पाहा,  जगातील अत्यंत तीक्ष्ण वित्तीय बुद्धिमत्ता, अत्यंत चैतन्यशाली वाणिज्यवीर आणि अत्यंत सृजनशील उद्योजक मी भारतात पहिले आहेत. एवढे सगळे हाताशी असूनही भारताला गरीब ठेवण्यात आपल्या नेत्यांना किती नियोजन करावे लागले असेल! फुटीरपणा हा भारताला जडलेला सगळ्यात मोठा विकार आहे. जातीय विद्वेष, भाषिक अतिरेकीपणा आणि प्रादेशिक निष्ठा एकता आणि एकात्मता ह्यांना धोका ठरत आहेत. राष्ट्रीय एकात्मता लोकांच्या काळजात रुजवावी लागते. ती नसेल तर तुमचे संविधान, सैन्य आणि शासन देशाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवू शकत नाही. खरे म्हणजे आपण गबाळे आणि निष्काळजी लोक आहोत, पण सर्वोत्तम वस्तू बनवून हवी असेल, तर ती भारतातच मिळू शकते हा जगाचा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानांकडे माणूस म्हणून बघतात. हिंदूंना जे सुखसमाधान भारतात मिळते ते मुसलमानांनाही मिळाले पाहिजे हा मोदींचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी त्रिवार तोंडी तलाक विरोधी निर्बंध केला. सबका साथ सबका विकास ह्याचा अर्थ भेदरहित समरसतापूर्ण समाज निर्माण करणे. पाकिस्तानी आतंकवादाला नेस्तनाबूद करण्यासाठी जसे सैन्य आणि शस्त्रसामग्री  अद्ययावत आणि अखंड आशावादी पाहिजे तसाच समाज पूर्णपणे एकात्म आणि राष्ट्रीय पाहिजे. एकात्म आणि राष्ट्रीय ह्या दोन शब्दांची काँग्रेसला भीती आहे. कारण मग काँग्रेसचे अस्तित्व हेतुशून्य होईल ही भीती आहे. म्हणून काँग्रेस चौकीदार चोर असल्याच्या बोंबा मारत रात्र जागवीत आहे. मोदींना एका व्यासपीठावर जुगलबंदीचे आव्हान दिले जात आहे. राहुल गांधींना हे सांगितले पाहिजे की मोदी त्यांच्या गेल्या 50 वर्षातील वैयक्तिक उत्पन्नाचा हिशेब द्यायला सिद्ध आहेत. राहुल गांधी ह्यांना ते जगतात तो पैसे कोणाचा आहे हे उघडपणे सांगता येईल काय? असे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य ह्या गुढीपाडव्यापासून आपण घेतले पाहिजे. आता नेहरू घराण्यातल्या लोकांना त्यांच्या मर्यादा सांगण्याची आणि त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply