पनवेल : बातमीदार : सांगुर्ली येथील हार्मोनी फाऊंडेशन, अल्कोलिक अॅन्ड ड्रग्ज रिहॅबिलेटेशन सेन्टर चालविणार्या विरोधात शहर पोलिसांनी 42 वर्षीय इसमाच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. येथे होणारी मारहाण व उपासमारीच्या या भीतीमुळे येथील सेंटरमधून 50 ते 60 जणांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सोमवारी दि. 1 व बुधवारी ता. 3 रोजी गेट उघडून 50 ते 60 जणांनी येथून पलायन केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले 50 ते 60 जण कोठे गेले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
विचुंबे येथे असलेले हार्मोनी सेंटर काही महिन्यांपूर्वी सांगुर्ली येथे भाड्याच्या जागेमध्ये हलविण्यात आले आहे. येथे जवळपास 183 जणांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. 23 मार्च रोजी येथे उपचारासाठी असलेल्या प्रशांत मधुकर पवार याचा मृत्यू झाला होता. या वेळी डॉक्टरांनी त्याच्या छातीच्या बरगडीला दुखापती झालेली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार सेंटर चालविणार्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला. त्याच काळात येथील सेंटरमधील सोमवारी व बुधवारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 50 ते 60 जणांनी येथून पलायन केले. यातील काही जण आपापल्या घरी गेले असून काहींचा पत्ता लागत नसल्याचे समोर आले आहे. नशा मुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जुना मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाठला व ट्रकला हात दाखवून त्यात बसून ते पळस्पे फाटा (जेएनपीटी रोड) येथे उतरले. त्यानंतर काहींनी आपल्या घराची वाट धरली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी होत असलेले हाल, मारहाण, अस्वच्छता, खायला न देणे या सार्या गोष्टीचे कथन त्यांनी आपल्या कुटुंबासोबत केले.
या हार्मोनी नशा मुक्ती सेंटरमध्ये जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता याच दरम्यान एका गाडीतून एक कुटुंब आपल्या नातेवाईकांना नेण्यासाठी आले होते. या वेळी येथे मिळत असलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी आपली कैफियत सांगितली. त्यांच्या पतीने देखील 3 एप्रिल रोजी येथील मारहाण व त्रासाला वैतागून पलायन केले होते. याचा जाब विचारण्यासाठी ते कुटुंब सेंटरमध्ये आले होते, मात्र या सेंटरमध्ये त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यांचे पती सतीश बामुगडे हे गेल्या 7 महिन्यांपासून येथे उपचार घेत असून त्यांना महिना 10 हजार रुपये या सेंटरमध्ये भरावे लागत आहेत, मात्र त्या बदल्यात येथे कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जेवणाचे हाल व मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. पोटभर जेवण देखील मिळत नसल्याने उपाशी पोटी सर्वांचे हाल येथे केले जात असत, तर मिलिंद सुतार याने देखील याच त्रासाला वैतागून लोखंडी ग्रील तोडून येथून पलायन केले आहे. 10 ते 15 जण मिळून उपचारासाठी आणलेल्यांना 1 नंबरच्या खोलीत नेऊन जबर मारहाण करत असल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे. येथे औषधे, गोळ्या, कपडे देखील कधी देत नसत, तसेच घरच्यांना देखील भेटून दिले जात नाही. तर येथे आलेले काही जण आपल्या घरी जात नसत ते तेथेच राहून इतरांना मार्गदर्शन करायचे. तर या ठिकाणी 4 ते 5 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती घरी गेलेल्या अजित चव्हाण याने दिली. त्यामुळे ज्यांचे मृत्यू झाले, त्यांची नोंद संबंधित ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली आहे की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यातील काहींनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली आहे.