शेतकर्यांचा माल थेट बाजारात
कर्जत : बातमीदार
पिकेल ते विकेल या अभियान अंतर्गत तालुक्यातील शेतकर्यांनी पिकवलेला माल शनिवारी (दि. 23) कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात विक्रीसाठी ठेवण्यात आला. या अभियानाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जिकरिया बुबेरे यांच्या हस्ते झाली. या अभियानात पहिल्याच दिवशी तालुक्यातील 30 हुन अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत.
शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पिकेल ते विकेल हे अभियान सुरू करण्यात आले आहे, त्यामागे शेतकर्यांनी पिकवलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश आहे. कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी शनिवारी आपला शेतमाल शहराचा आठवडा बाजार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर विक्रीसाठी ठेवला. या वेळी कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे आणि शेतकरी उपस्थित होते. शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला, पालेभाज्या, कंदमुळे आणि कडधान्ये तसेच जैव खते विक्रीसाठी बाजारात आणली होती.
पिकेल ते विकेल या अभियानात अडते किंवा दलालांचा सहभाग नसल्याने शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.
-प्रवीण कोंडीलकर, शेतकरी, बार्डी, ता. कर्जत