Breaking News

चेन्नईची खेळपट्टी वाढवणार भारतीय खेळाडूंचे टेन्शन!

चेन्नई ः वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविल्या जाणार आहेत, पण चेन्नईच्या या खेळपट्टीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. कारण चिपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गवत ठेवण्यात आले आहे. या पाच खेळपट्ट्यांपैकी एका खेळपट्टीची भारतीय टीम निवड करेल. मागच्या मार्चपासून लॉकडाऊनमुळे या मैदानात एकही सामना झाला नाही. त्यामुळे खेळपट्टीच्या व्यवहाराबाबत अनेकांना शंका आहे.
खेळपट्टीवर गवत असल्यामुळे इंग्लंडकडे असलेले अंडरसन, ब्रॉड, आर्चर आणि स्टोक्स हे फास्ट बॉलर भारतीय बॅट्समनना अडचणीचे ठरू शकतात. चेन्नईच्या मैदानात शेवटचा कसोटी सामना योगायोगाने भारत आणि इंग्लंड यांच्यातच झाला होता. 2016 साली झालेल्या या सामन्यामध्ये करुण नायरने त्रिशतक केले होते, ज्यामुळे भारताने 7 विकेट्स गमावून 759 धावा केल्या होत्या. नायरच्या नाबाद 303 धावांशिवाय केएल राहुलने 199 धावांची खेळी केली होती. या सामन्यामध्ये तब्बल 1443 धावा झाल्या आणि फक्त 27 विकेट्स गेल्या. भारताने हा सामना इनिंग आणि 75 धावांनी जिंकला होता.
याआधी 2009 साली झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने चौथ्या इनिंगमध्ये यशस्वीरीत्या 387 धावांचे आव्हान पार केले. सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीमुळे भारताने तो सामना 6 विकेट्सने जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीआधी या मैदानात दोन सामने होणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी पुन्हा बॅटिंगसाठी अनुकूल होण्याची शक्यता आहे.
भारताने इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानात 9 सामने खेळले. यातील 5 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला, तर 3 सामने इंग्लंडने जिंकले आणि एक सामना ड्रॉ झाला. चेन्नईच्या मैदानात भारताने शेवटची कसोटी 1999 साली पाकिस्तानविरुद्ध गमावली. सचिन तेंडुलकरच्या साहसी खेळीनंतरही भारताने तो सामना 12 धावांनी गमावला होता.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply