Breaking News

‘सीकेटी’त विद्यार्थ्यांचे स्वागत;कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले 10 महिने बंद असलेले, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 1) नव्या उत्साहाने, विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा काव्यानुसार अनंत आमची ध्येयसक्ती, अनंत अन् आशा हा दुर्दम्य आशावाद घेऊन नव्या विश्वासाने नव्या प्रेरणेने एकत्र येऊन सामाजिक अंतराचे भान ठेवून शासन नियम प्रणालीनुसार मास्क व सॅनिटायझर, ऑक्सिजन लेवल तपासणी, सामाजिक अंतर ठेवणे या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सर्वांत जास्त विद्यार्थी संख्या असणारे हे संकुल असून यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान अशा तीन शाखा आहेत. विद्यालयात इयत्ता 11वी व 12 वीच्या एकूण 32 तुकड्या व माध्यमिक विभागाच्या एकूण 18 तुकड्या अशा एकूण 50 तुकड्या आहेत. सोमवारी इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे एकूण तीन अधिवेशनांमध्ये विद्यालय भरवले जाणार आहे. नवीन आव्हानानुसार विद्यार्थीरूपी पाखरांनी शाळा पुन्हा गजबजणार आहे.कोवळ्या जीवांना प्रत्यक्ष ज्ञानरूपी मंदिरात, अक्षरांचा स्पर्श व्हावा, नको हात एकही जो पाटीलाही पारखा व्हावा हीच जिद्द मनात घेऊन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे संचालक व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष व भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत मॅडम, सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यालयात प्रेरणादायी फलक

हे ज्ञानरूपी विद्यामंदिर सुरू करताना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पाखरांनो शाळा तुमची वाट पाहतेय, असे बोर्ड (फलक), फ्लॅग, स्लोगन्स तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागतावेळी सनई-चौघडा वाजवून सुरमयी वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्यक्ष शिक्षक हातात प्रेरणादायी स्लोगन, (फलक) बोर्ड घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वागतास सज्ज होते. या वेळी सामाजिक अंतर ठेवून चौकटीत उभे राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने वर्ग सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोविड काळात बंद असलेल्या शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार सोमवारी (दि. 1) चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात इयत्ता 9 वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले. सकाळी ठीक 8 वाजता शाळेची घंटा वाजली. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांचे टेंपरेचर चेकींग केले गेले. सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करीत दोन वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने दिनक्रमाची सुरुवात झाली. पूर्वा खेडेकर, मनोज मातंग, वर्षा वारे, मनीषा नारखेडे, भरत जितेकर, प्रसाद जोशी, महेश पोपेटा, प्रकाश रिसबूड या शिक्षकांनी निमेश म्हात्रे, राम जितेकर, विशाल पाटील, जितेंद्र माळी, संतोष हाटे या कर्मचार्‍यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी स्वच्छता व शिस्तीचे व्यवस्थित पालन केले. गायत्री कोटीयन, उज्ज्वला सिमरय्या, शशिकला पाटील, स्वाती काळे, मंजुषा भगत, प्रकाश पांढरे या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. एकूण 37.68 विद्यार्थ्यांनी शाळेत हजर होण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्रत्यक्षात 35.47 विद्यार्थी शाळेत हजर होते. अनेक महिन्यांनी विद्यालयात प्रवेश केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद व उत्साह दिसत होता.  मुख्याध्यापक संतोष चव्हाण व पर्यवेक्षक निरजा अदुरी यांचे उत्कृष्ट नियोजन आणि नियमांचे काटेकोर पालन याबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. थोड्याच दिवसांत इतर वर्गही सुरू होतील, असा विश्वास मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,  भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply