Breaking News

खालापूर टोल नाक्यावर दोन अपघातात चार जखमी

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाका अपघात नाका झाला असून शनिवारी (दि. 30) दोन अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या अपघातात स्विप्ट डिझायर कार क्रमांक एमएच-03-सीपी-6864 शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई हून पुण्याकडे जात असताना खालापूर टोल नाका येथे टोल भरण्यासाठी थांबली होती. त्या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेला ट्रक क्रमांक एमएच 46 बीबी 2600 वरील चालक मोहम्मद अखतर मिया हुसेन (रा. पडारीया, पो. बरसो, तहसिल बर्ही, जिल्हा हजारीबाग, राज्य झारखंड) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या स्विफ्ट कारला ट्रकची जोरदार धडक बसून कारमधील सागर रामदास ढमढेरे (वय 27), प्रमिला रामदास ढमढेरे (वय 47), जयेश संजय भोसले (वय 24), विजय बबन कुराडे (वय 43, सर्व राहणार घाटकोपर भटवाडी मुंबई) हे जखमी झाले. कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रकचालक मिया हुसेन विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मिया हुसेनला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार अमित सावंत हे करीत आहेत.

टोल नाक्यावरील दुसरा अपघात शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला. परळ मुंबई येथे राहणारे स्टॅन्ली रिबेरो (वय 54) त्यांची टाटा नॅनो कार क्रमांक एमएच 02 बीडब्ल्यू 1397 घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जात असताना खालापूर टोल नाका येथे टोल भरण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या इरटिगा कार क्रमांक एमएच 04 जीयू 5609 या कारने रिबेरो यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. ठोकर देणारा कारचा चालक दुर्गेश मौर्य विरोधात रिबेरो यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार नीलेश कांबळे हे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply