नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलकांनी आपली विश्वासार्हता गमावल्याचे गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. या वेळी गडकरींनी अर्थसंकल्पाविषयीही आपले मत मांडले. अर्थसंकल्पाचे आणि विशेषत: स्क्रॅप पॉलिसीचे त्यांनी कौतुक केले आहे.
शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दिल्ली आंदोलनात 26 जानेवारी रोजी जे घडले ते निश्चितच राजकीय षड्यंत्र होते, असे म्हटले आहे.
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन देणार्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. या आंदोलनात त्यांचे फोटोही दिसले. मग शेतकरी आंदोलनात हे कसे आले, असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, लाल किल्ल्यावरील घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचेच सर्वांत मोठे नुकसान झाले. कारण आंदोलक शेतकर्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तसेच या आंदोलनाची सहानुभूतीही संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनीही शेतकर्यांशी संवाद, चर्चा करायला तयार आहे. या
चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल, असे स्पष्ट केले होते याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.
स्कॅ्रपिंग पॉलिसीमुळे 50 हजार जॉबची निर्मिती
अर्थसंकल्पातील स्क्रॅपिंग पॉलिसीचे या वेळी नितीन गडकरी यांनी कौतुक केले. स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला चालना मिळणार आहे. देशात एकूण एक कोटींपेक्षा जास्त गाड्या प्रदूषण करीत होत्या, तसेच जास्तीचे पेट्रोलही खात होत्या. त्यामुळे पहिला फायदा हा प्रदूषण कमी होईल. स्क्रॅपिंग मटेरियलचे रिसायकलिंग होईल, असे सांगून गडकरी म्हणाले की, सरकारच्या या नवीन पॉलिसीमुळे देशात 50 हजार जॉब निर्माण होतील, तसेच 10 हजार कोटींची गुंतवणूकही होईल. आजपासून 15 दिवसांत मी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर करणार आहे.