पाली ः प्रतिनिधी
सुधागड पाली येथील मोहन तुकाराम हुले (मॅक्मोहन) या युवकाने नगर जिल्ह्यातील सांधन व्हॅलीजवळील सुमारे 710 फूट उंचीचा बाण सुळका सर केला आहे. हा सुळका पर्वतारोहणामध्ये चित्तथरारक मार्गासाठी प्रसिद्ध आहे. मोहिमेत मोहन समवेत पुणे व नगर जिल्ह्यातील आठ गिर्यारोहक होते. बाण सुळक्याची चढाई अत्यंत अवघड आहे. मोहनच्या कामगिरीने सुधागड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
मॅक्मोहन व त्यांच्या टीमने ही अवघड बाजूची चढाई विक्रमी वेळेत पूर्ण करून माथ्यावर आपल्या सर्वांची प्रेरणा व अभिमान असलेला तिरंगा प्रजासत्ताक दिनी फडकावला. पहिल्यांदा बाण सुळका दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक यांच्या संघाने 1986मध्ये सर केला. त्यानंतर विवेक मराठे आणि त्यांच्या पथकाने 1991मध्ये या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. पाण्याचे दुर्भिक्ष, मधमाशांची मोठमोठी पोळी, अतिशय दुर्गम प्रदेश आणि अत्यंत खडतर चढाईमुळे गिर्यारोहकांना हा सुळका आव्हान देत असतो.
दुर्गप्रेमी गिरीभ्रमण व सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह यांनी बाण सुळक्याच्या सभोवतालच्या दरीमुळे आरोहकांच्या सुरक्षेचा विचार करून जुने पारंपरिक बोर्ड बदलून नवीन महात्मा गांधी बोल्ट (एमजी बोल्ट) बसवण्यात आले आहेत. त्या मोहिमेतही मॅक्मोहनचा सहभाग होता. मॅक्मोहन गिर्यारोहणात उत्कृष्ट कामगिरी करीत असून सह्याद्रीतील अनेक सुळके आपल्या मित्रांसह सर केले आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …