भाजप नगरसेवक आणि रहिवाशांच्या विरोधानंतर कामकाज थांबले
पनवेल : वार्ताहर
कामोठे सेक्टर 36 आणि सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्प्लेक्सच्या समोरील डिव्हाइडरवर उभारण्यात येत असलेल्या मोबाइल टॉवरच्या बांधकामाला पनवेल महानगरपालिकेने स्थगिती दिली आहे. स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि रहिवाशी यांच्या विरोधानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या परवानगीनंतर, इडक मोबाइल टॉवर कंपनीने, कामोठे सेक्टर 36 आणि सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्प्लेक्ससमोरील डिव्हाइडरवर, मोबाइल टॉवर उभारणीसाठी बांधकाम युद्धपातळीवर सुरू होते. या मोबाइल टॉवरच्या उभारणीची माहिती स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि याच परिसरातील रहिवाशी सोसायट्यांना मिळाल्यानंतर, या मोबाइल टॉवरच्या बांधकामाला रहिवाशी आणि सोसायट्यांनी विरोध दर्शविला आहे. या मोबाइल टॉवरमुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यामध्ये शुभागण कॉम्प्लेक्स, नंदनवन पार्क सोसायटी आणि कृष्णा सोसायटीने विरोध दर्शविला आहे.
स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि रहिवाशी यांनी यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी पत्र लिहून विरोध दर्शविल्यानंतर, नगररचना विभागाने मोबाइल टॉवर कंपनीला परवानगी दिलेल्या पत्रातील अटीनुसार अट क्र. 8 नुसार बांधकाम का रद्द करू नये याबाबत 7 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्या मुळे या बांधकामाला पालिके स्थगितीदेखील दिली होती. पालिकेच्या निर्णयानंतरच पुढील बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे पुन्हा या मोबाइल टॉवरच्या बांधकामाला ब्रेक लागला आहे.