म्हसळा : प्रतिनिधी
आव्वाच्यासव्वा वीज बिले आणि बिले न भरल्यास वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीसा दिल्याने महावितरण विरोधात शुक्रवारी (दि. 5) म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या बाबत आपल्या धोरणात योग्यत्या सुधारणा न केल्यास भविष्यात जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा या वेळी प्रकाश रायकर यांनी दिला.
भाजपाचे म्हसळा तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे, प्रसाद विचारे, सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील, चिटणीस सुनील विचारे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सुनंदा पाटील, युवामोर्चा तालुका सरचिटणीस विजय पाष्टे, मनोहर जाधव, राजेंद्र चव्हाण, शरद कांबळे, जितेंद्र नाक्ती, उद्देश पारदुले, धर्मा पाटील, रामचंद्र भुवड, सुभाष वाघे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
कोरोना काळातील वीज बिले माफ करण्यात यावीत, अशी मागणी भाजपने केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ न करता उलट महावितरण कंपनीकडून ग्राहकांना नोटिसा पाठवून वीज जोडण्या कट करून जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केली असल्याचे प्रकाश रायकर यांनी या वेळी सांगितले.
माणगावात महावितरणविरोधात हल्लाबोल
माणगाव : प्रतिनिधी
महावितरणच्या अवाजवी वीज बिलांविरोधात माणगाव तालुका भाजपच्या वतीने येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी (दि. 5) टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या कालावधीत अवाजवी वीज बिल आकारून महावितरणने ग्राहकांना वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. काही ठिकाणी जोडण्या तोडायलादेखील सुरुवात केली आहे. कोरोना काळातील विजेचे बिल माफ करण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती, मात्र आता घूमजाव करीत वीज बिल भरण्याची सक्ती केली जात आहे. या महाविकास आघाडी सरकारचा आणि महावितरणचा निषेध करण्यासाठी माणगाव तालुका भाजपने शुक्रवारी येथील महावितरण कार्यालय परिसरात टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. या वेळी कोरोना काळातील वीज बिले माफ करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी महाविरतणला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. सक्तीची वीज बिल वसुली थांबवण्यात येईल, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिले माफ न करता उलट महावितरणकडून नोटिसा पाठवून जोडण्या कट करून जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केली आहे. कोरोना काळात रोजगार बुडाले ते वीज बिल भरणार कसे? त्यांची पिळवणूक करणे कितपत योग्य आहे, असा सवाल भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी या वेळी केला.
भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र साळी, माणगांव तालुका सरचिटणीस योगेश सुळे, शहर अध्यक्ष राजू मुंढे, समन्वय समिती अध्यक्ष नाना महाले, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शर्मिला सत्वे, तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, दिपाली जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल गलांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.