अलिबाग : प्रतिनिधी
मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आणणार्यांना अटक करण्यास गेलेल्या वनखात्याच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसनी आदिवासी वाडीवरील दोन आणि पोयनाड येथील चारजण बुधवारी (दि. 3) सायंकाळी मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून त्या आरोपींना सापासह ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपींसह इतर काहीजणांनी वनखात्याच्या अधिकार्यांवर कोयत्याने प्रहार करून इतर कर्मचार्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यात वन अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.
या प्रकरणी एकूण सहा जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 326, 353,143, 147, 148 आणि 149 तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे अधिक तपास करीत आहेत.