Breaking News

पवारांकडे अदानी येऊन गेल्यानंतर वीज बिलमाफीचा निर्णय मागे

राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

ठाणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिल दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आधी वीज बिल माफ करू म्हटले, पण गौतम अदानी हे शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतेही वीज बिल माफ करणार नाही, असे जाहीर केले. सरकार वीज कंपन्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. 6) ठाण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वीज कंपन्यांना कोणता फायदा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर हे कसे चालेल असा सवाल करून राज ठाकरे म्हणाले की, आधी ऊर्जामंत्री म्हणाले वीज बिल माफ करू. त्यानंतर घुमजाव केले. मग मी राज्यपालांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी मला शरद पवारांशी बोलायला सांगितले. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलणे झाले.
पवारांनी सांगितले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून ते मला पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेल या सर्वांशी पवार बोलणार होते, पण पाच-सहा दिवसांनी मला कळाले की अदानी हे पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहीत नाही. त्यानंतर सरकारने वीज बिल माफ होणार नाही, असे जाहीर केले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सरकार आणि वीज कंपन्यांचे साटेलोटे
राज्य सरकार आणि वीज कंपन्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. सरकार इतके निर्दयीपणे कसे वागू शकते हेच कळत नाही. मुलांच्या परीक्षांचाही ते विचार करत नाहीयत. वीज बिल माफ करण्यासाठी कंपन्यांशी बोलावे लागेल, पण या चर्चाच थांबल्या आहेत. मग यात काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय चर्चा थांबल्या असतील का, असा सवाल करून राज्य सरकार वीज कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम करतेय, असे म्हणत राज यांनी संताप व्यक्त केला.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply