सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडले, असे खोटेनाटे सांगून आम्हाला बदनाम केले आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 7) शिवसेनेवर हल्लाबोल केला. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ येथील पडवे येथे उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी शिवसेनेकडून केल्या जाणार्या आरोपांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. उद्घाटन समारंभास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्त्वांना तोडत आहेत. ते तत्त्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्त्व तोडणारे आहेत, असे शाह म्हणाले. शिवसेनेवर घणाघाती टीका करताना ते पुढे म्हणाले की, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले, मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही. सगळ्यांसमोर बोलतो. मी असे कोणतेही वचन दिले नव्हते. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. उलट तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती. या वेळी शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करीत सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारमधील तीन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नाही. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो की, तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आले. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडले, त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसे आहोत. अशा प्रकारचे खोटे आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिले होते की एनडीएचे सरकार आले, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले. आपल्या भाषणात शाह यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे तोंडभरून कौतुक केलेे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे असून, जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : नारायण राणे
शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची बोचरी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी या वेळी केली. विकासकामांना शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही आंदोलन करणारी शिवसेनाच होती. एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात, असा टोला राणे यांनी लगावला.