कर्जत : प्रतिनिधी
येथील कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील रूचिता सोलंकी सोमवारी (दि. 15) दीक्षा (संन्यास) घेणार आहे. संन्यास घेणारी ती कर्जत शहरातील दुसरी मुलगी ठरणार आहे.
सोलंकी परिवारातील सुभाष कविता सोलंकी यांची कन्या रूचिता (25) हिने इंटरिअर डिझायनर केले आहे. सामाजिक कर्तव्याचा त्याग करून ती सोमवारी आध्यात्मिक कर्तव्याचा स्वीकार करणार आहे. कर्जतमधील जैन महिला मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 10) सकाळी शहरातील जैन मंदिरापासून रूचिताची मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून पुन्हा जैन मंदिरात आली. मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाडीवर रूचिता विराजमान झाली होती. या मिरवणुकीत फक्त महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, यापूर्वीसुद्धा 4 मार्च 2014 रोजी कर्जतमधील टिनाकुमारी हिने संन्यास घेतला होता. त्यानंतर सात वर्षांनी रूचिता दीक्षा घेणार आहे. तत्पूर्वी रविवारी (दि. 14) तिची कर्जत शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.