Breaking News

देवपाडा शाळा झाली ’स्टडी मॉल’

थिंक शार्प फाऊंडेशनकडून डिजिटल व्यवस्था

कर्जत ः बातमीदार

कोरोना महामारीच्या कालखंडात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. देवपाडा शाळेत इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे 135 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

देवपाडा दुर्गम भागात वसल्याने कोणत्याही प्रकारचे मोबाइल नेटवर्क, इंटरनेट सुविधा नाहीत. तरीही येथील शिक्षकांनी डिजिटल शाळा निर्माण करण्याचे स्वप्न पाहून ते साकारही केले. देवपाडा शाळेत स्टडी मॉल शाळेचा शुभारंभ झाला.

स्टडी मॉल म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, सांस्कृतिक व तंत्रज्ञान अशा सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूरक सुविधा एकाच शाळेत उपलब्ध करून देणे. डिजिटल क्लासरूम, गणित-विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे साहित्य, शैक्षणिक खेळ, विशेष इंग्रजी साक्षरता प्रशिक्षण, सोलार शाळा, वायफाय सुविधा आदी सर्व सुविधांयुक्त शाळा म्हणजे स्टडी मॉल शाळा होय. थिंक शार्प फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष संतोष फड यांनी शाळेच्या विनंतीनुसार दिलेले उच्च प्रतीचे प्रोजेक्टर संच, परिपूर्ण दर्जेदार ई-अभ्यासक्रम यांचा विद्यार्थी अर्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

याचे उद्घाटन कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ध्रुव कन्सल्टन्सीमार्फत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना कंपास पेटी, रंगाचे खडू व हेडलॅम्पचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील शालेय व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक आडे, शिक्षक गोतारणे, रवींद्र पष्टे, संजय पंडित, सगणे मॅडम, प्रशांत दळवी यांनी सुविधा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य केले. या मदतीमुळे सर्व विद्यार्थी-पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply