Breaking News

दुसर्‍या कसोटीवर भारताची पकड

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंड 3 बाद 53

चेन्नई : वृत्तसंस्था
482 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज आहे, तर भारताला सात गड्यांची आवश्यकता आहे.
आघाडीचे फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट टिच्चून खेळत होता. तो 62 धावांवर माघारी परतला. दुसरीकडे घरच्या मैदानावर अश्विनने इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी दहाव्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. अश्विन 148 चेंडूंत 14 चौकार व एक षटकारासह 106 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला. तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडचे तीन फलंदाज अवघ्या 53 धावांवर माघारी परतले. अक्षर पटेलने दोन, तर अश्विनने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात पुजारा (7) पुन्हा विचित्र पद्धतीने बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर यष्टीरक्षक बेन फोक्स याने सुरेख पद्धतीने रोहित शर्माला (26)  यष्टिचीत करून माघारी पाठवले. बढती मिळालेला ऋषभ पंत (8), अजिंक्य रहाणे (10) आणि अक्षर पटेल (7) एकामागोमाग माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था 6 बाद 106 अशी झाली होती, पण कर्णधार विराट आणि अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 177 चेंडूंत 96 धावांची भागीदारी करीत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. विराट माघारी परतल्यानंतर अश्विनने जबाबदारीने खेळ करताना कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने सिराजला सोबत घेताना दहाव्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला.
अश्विनची अष्टपैलू कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईतील दुसर्‍या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने शतकी खेळी केली. यासोबतच तो इंग्लंडविरुद्ध एक हजारहून अधिक धावा आणि 100हून जास्त विकेट्स घेणारा जागतिक सातवा, तर दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन (ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल (ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज), रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड), कपिल देव (भारत), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply