कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गंगानगर भागात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना झाल्याने नेरळमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच इमारतीच्या बाजूला रविवारी मोठ्या जोषात साखरपुडा समारंभ झाल्याने या समारंभातून कोरोना पसरणार तर नाही ना? अशी देखील भीती आरोग्य विभागाला आहे. कर्जत तालुक्यात मागील दोन महिन्यात कमी झालेल्या कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला कर्जत तालुक्यातील पहिला रुग्ण एप्रिल 2020मध्ये नेरळ गावात आढळला होता. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात कर्जत तालुक्यात दररोज 30-40 रुग्ण आढळून येत होते. कोरोना संसर्ग झाल्याने होणारे मृत्यू आणि वाढणारी रुग्ण संख्या यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नोव्हेंबर 2020पासून जानेवारी 2021पर्यंत कर्जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अनेकदा शून्य असायचे. कोरोनाचा नवीन विषाणू परदेशात पसरत असल्याच्या बातम्या येवू लागल्यानंतर आता आढळून येणार्या रुग्णांबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शनिवारी नेरळमधील गंगानगर भागात एकाच कुटुंबात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. त्या एकाच कुटुंबातील दोन ज्येष्ठ आणि दोन तरुणांना कोरोनाचा संसर्ग कुठे झाला? कोणाच्या संपर्कात आल्याने झाला? याबाबत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना या रुग्णाची पार्श्वभूमी शोधून काढता आली नाही. शनिवारी ज्या इमारतीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले होते, त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये रविवारी साखरपुडा समारंभ होता. त्यात सहभागी लोकांना त्याच भागातील कोरोनाची पार्श्वभूमी समजल्यानंतर त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1901वर जाऊन पोहचली आहे. तर तब्बल 102 जणांचे कोरोनाने बळी घेतले असल्याने तालुक्यातील जनतेमध्ये अजूनही कोरोनाची भीती कायम आहे.