चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर जहरी टीका
मुंबई ः प्रतिनिधी
लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचेे राज्य असून, हे राज्य तुमच्या घरचे नव्हे, तर कायद्याचे आहे. लोक आता केवळ मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 20) ठाकरे सरकारला दिला. अजिंक्यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करीत तुम्ही सत्तेत बसलात. येत्या निवडणुकीत जनताच तुम्हाला जागा दाखवेल, अशी टीकाही पाटील यांनी या वेळी केली.
राज्यातील नामांकित व्यक्तींना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. देशद्रोहाचे काम करणार्यांना संपूर्ण संरक्षण देण्याचे कामही हे सरकार करीत आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनाही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिवगाण स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण स्पर्धा हा कार्यक्रम आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करीत अजान स्पर्धा, टिपू सुलतान जयंतीसह इतर स्पर्धा आयोजित केल्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा राज्याध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. एक जण आधार मैदानावरून शेतकर्यांचा मोर्चा काढतो. हे सर्व चालते आणि शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला तुम्ही बंदी घालता हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, आम्ही उपस्थित करणार्या प्रश्नांना ते घाबरत आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीला ते घाबरत आहेत. पूजा चव्हाण, धनंजय मुंडे यांचा विषय या अधिवेशनात निघणार आहे. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांच्या माफीमध्ये 50 हजार रुपये देणार होते. त्या लोकांना अद्याप ते पैसे मिळाले नाहीत. तोही विषय निघणार आहे. राज्यात 70 हजार वीज कनेक्शन तोडली जाणार आहेत. त्यामुळे सरकार कोरोनाच्या भीतीचे कारण सांगत अधिवेशन कमी दिवसांचे आणि लांबवत आहेत, असा आरोपही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केला.