मुंबई : प्रतिनिधी
लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने 21 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील खार रेल्वेस्थानकात घडला. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. सुमेध जाधव असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो वडाळा येथील, तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. जखमी झालेली तरुणी आणि तिला धक्का देणारा सुमेध दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे. दोघांमध्ये चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले, मात्र सुमेधला दारूचे व्यसन असल्याचे तरुणीला कळाले. त्यानंतर तरुणी त्याच्यापासून अंतर ठेवून राहू लागली, पण सुमेध तरुणीला त्रास देऊ लागला. या प्रकरणी तरुणीने त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती, मात्र तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. सुमेध शुक्रवारी सायंकाळी तिचा पाठलाग करीत अंधेरी रेल्वेस्थानकावरून लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करीत मदत मागितली. रेल्वेस्थानकात तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करीतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला, मात्र तरुणीने तो फेटाळून लावला. लग्नाला नकार दिल्यानंतर सुमेधने स्वतःला संपवण्याची धमकी दिली. रेल्वस्थानकात येणार्या गाडीच्या दिशेने तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडले आणि लोकलच्या दिशेने घेऊन गेला. रेल्वेस्थानकातून गाडी सुटल्यानंतर त्याने तरुणीला प्लॅटफॉर्म व धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकलले. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.