अलिबाग : रामप्रहर वृत्त :प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मतदार राजा जागा हो’ या पथनाट्यातून जनजागृती केली.
भारतीय निवडणूक आयोग, रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या मतदार राजा जागा हो, या पथनाट्यातून वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस नसून तो राष्ट्रीय महोत्सव आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत नेण्या-आणण्यासाठी सोय करण्यात आली आहे, तसेच या वेळी ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅट मशीनदेखील लावण्यात येणार आहे. म्हणजेच आपण कोणाला मत दिलं आहे हे व्हीव्हीपॅट मशीनवर सात सेकंदासाठी दिसणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने या राष्ट्रीय महोत्सवात कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सहभागी होऊन मतदान केलेच पाहिजे, असा संदेश दिला. या पथनाट्यात प्रिझम संस्थेच्या स्वप्नाली थळे, सपना पटवा, प्रेम पाटील, प्रतिक कोळी, विनोद नाईक, मनस्वी सहस्रबुद्धे, अभिजित नाईक, प्रतिक पाटील, कुलदीप पाटील आदी कलाकार सहभागी झाले होते.
नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी तथा नोडल अधिकारी चिंतामणी मिश्रा, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांच्यासह अधिकारी व मतदार या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.