Breaking News

मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी

मंत्री, आमदार-खासदारांकडून नियमांचे उल्लंघन

पनवेल : प्रतिनिधी
फेसबुक लाइव्हमधून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे, असे सांगत केले, मात्र या कार्यक्रमात प्रमुख नेतेमंडळींकडून सामाजिक अंतराच्या नियमाची ऐशी तैशी करण्यात आली. कोरोना वाढत आहे, नियम पाळा, असे सांगणारे खुद्द मुख्यमंत्री व महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी नियम मोडत असल्याचे या वेळी पाहायला मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारितील न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे व सुनील तटकरे, आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती सभापती देवकी कातकरी, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, सिडको उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री, खासदार व आमदार असे प्रमुख नेते सोशल डिस्टन्स न पाळताच भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित असल्याचे दिसून आले.
आमदार प्रशांत ठाकूर व तत्कालीन सरकारमुळे न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजना मार्गी


न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि तत्कालीन राज्य सरकारने केलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत. या संदर्भात त्यांनी व सहकार्‍यांनी तत्कालीन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व सरकारकडे प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याने ही योजना मंजूर झाली होती.
पनवेल महापालिकेच्या हद्दीत पाणीटंचाई भासू लागली म्हणून भाजपच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांसाठी शहरी निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसी पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्याच्या सूचना तत्कालीन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ऑगस्ट 2018मध्ये दिल्या होत्या. या वेळी मंत्री लोणीकर यांनी ही पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत असताना जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलून गळतीचे प्रमाण रोखण्याचे आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले होते.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ उपस्थित होते. न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाल्याने या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply