800 खाटा राखीव
नवी मुंबई ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत 700 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता आहे. त्यामुळे बंद केलेली काळजी केंद्र सुरू करण्याबरोबर औषधसाठा नियोजनाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने 800 खाटांची व्यवस्था राखीव ठेवण्यात येणार आहे.
रुग्णवाढ कमी झाल्याने पालिका प्रशासनाने निर्यातभवन व राधास्वामी सत्संग भवन येथील कोरोना केंद्र बंद करून ती जागा संबंधित संस्थेला परत करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता हा निर्णय तात्पुरता रद्द केला असून या दोन्ही जागा ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने येथील साफसफाईलाही सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील कोरोनाची दाहकता दिवाळीपूर्वीपर्यंत कमी झाल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली कोरोना काळजी केंद्र बंद केली होती. सध्या शहरात एकमेव सिडको प्रदर्शनी केंद्र येथे व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काळजी केंद्रांसाठी घेतलेल्या जागाही परत करण्यात येत आहेत. निर्यातभवन तसेच राधास्वामी सत्संग भवन संबंधित संस्थेला परत देण्याची प्रक्रियाही सुरू केली होती, मात्र आता या ठिकाणी पुन्हा काळजी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील 800पेक्षा अधिक खाटांची व्यवस्था राखीव म्हणून सज्ज ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरात दररोजच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. नव्या रुग्णांची संख्या 37पर्यंत कमी झाली होती, ती आता शंभरपर्यंत वाढली आहे, तर उपचाराधिन रुग्ण 700च्या खाली आले होते, ते आता पुन्हा 1000पर्यंत गेले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 1100च्या पुढे गेली आहे.
दरम्यान, शहरात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. निर्यातभवन व राधास्वामी सत्संग भवनमध्ये गरज पडली तर सुविधा करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.