पनवेल : जिमाका
भारतीय निर्वाचन आयोग, भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरीच ब्यूरो, गीत व नाटक विभाग-महाराष्ट्र व गोवा क्षेत्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यात रोह्यातील स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदानविषयक जनजागृती केली.
विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती अभियान या विषयावर पनवेल तालुक्यात चित्ररथ फिरवून स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या स्वयंसेवकांनी ’मतदान-आपली जबाबदारी’ या पथनाट्यातून मतदार जागृती केली. या वेळी मतदानाचे महत्त्व, मतदान न करण्याचे दुष्परिणाम, भारतीय निर्वाचन आयोगातर्फे दिव्यांगांसाठी सुलभ मतदान, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांद्वारे मतदात्याला त्याच्या मतदानाबाबत मिळणारी सुरक्षेची हमी आदी प्रभावीपणे हाताळण्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील मानसरोवर, कामोठे सेक्टर 35, कामोठे पोलीस ठाणे, कोपरा, लिटिल वर्ड मॉल, खारघर रेल्वेस्थानक, बसस्थानक, हिरानंदानी हायवे, कळंबोली भीमा कॉम्प्लेक्स नाका, बसस्थानक, देवीचापाडा, कानपोली, पाले बुद्रुक अशा विविध ठिकाणी झालेल्या पथनाट्य जनजागृती दौर्यात कलाकार म्हणून प्रतीक कोळी, प्रतीक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, सुचिता साळवी, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई आदी कलाकारांनी आपला सहभाग दिला.
या उपक्रमास इलेक्शन डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, स्वीप पथक प्रमुख एस. के. वायचळे, सहाय्यक शिक्षक मंगेश जाधव, अमोल नाणेकर, मनपा लिपिक जयराम पादीर, विजय गावंडे, महेश भापकर यांच्यासह अन्य मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जागृतीपर विविध उपक्रम मतदारसंघनिहाय प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये पथनाट्याचाही समावेश होता.