अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवार (दि. 24)पासून मोटेरा येथील जगातील सर्वांत मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी इंग्लंडने, तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने तिसरा सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तिसरा कसोटी सामना दिवसरात्र पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. भारताचा हा तिसरा दिवसरात्र कसोटी सामना आहे. मोटेरा स्टेडियमवरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळू शकतो.
मोटेरा स्टेडियमवरील आकडेवारीवर नजर फिरवल्यास तिसर्या कसोटी सामन्यात फिरकीपटूचा दबदबा असल्याचे दिसून येईल. येथील खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकीपटूंनी 36च्या सरासरीने 199 बळी टिपले आहेत, तर वेगवान गोलंदाजांनी 33.6च्या सरासरीने 155 जणांना बाद केलेले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही वाव आहे.
उमेश यादवचा मार्ग मोकळा
अहमदाबाद येथे होणार्या इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उमेश यादव याच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्याने वेगवान गोलंदाज उमेशचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघाकडून खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात उमेशच्या पोटरीचा स्नायू दुखावल्याने त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.
इशांत शर्माचा 100वा सामना
मोटेराच्या या नव्या ऐतिहासिक स्टेडियमसह भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी हा सामना खूप खास आहे. इशांत मोटेराच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीचा 100वा कसोटी सामना खेळणार आहे. महान भारतीय अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटी सामना खेळणारा इशांत हा दुसरा वेगवान गोलंदाज असेल. इशांतने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील 300 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …