खारघर : प्रतिनिधी
खारघर रेल्वे स्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरित्या वाहन चालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात सिडकोचे अधिकारीदेखील सहभागी असण्याची शक्यता नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली असून बाविस्कर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
गुरुवारी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी खारघर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये धाव घेत या अनधिकृत पार्किंग शुल्क वसुलीची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासमोरच सर्रास अनधिकृत पार्किंग शुल्काची वसुली सुरू असल्याचे दिसून आली. याबाबत बाविस्कर यांनी या वसुलीबाबत विचारणा केली असता त्यांना परिवहन सिडकोच्या परिवहन विभागातील संतोष महाले या अधिकार्याचे नाव सांगण्यात आले. यासंदर्भात तत्काळ बाविस्कर यांनी परिवहन विभागाच्या अधिकारी गीता पिल्लई यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनीदेखील या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
एकीकडे कोविड काळात नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले असताना सिडकोच्या पे अँड पार्कच्या नावाखाली अशाप्रकारे नागरिकांच्या माथी अनधिकृतरित्या पार्किंग शुल्क मारणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या पार्किंग मधूनच दुचाकींची चोरीदेखील झाली आहे. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे चोरीच्या घटनांमध्ये तर येथील कर्मचार्यांच्या हात नाही ना? अशाप्रकारे असंख्य प्रश्न उपस्थित होते आहे. सिडकोच्या नावाखाली असे प्रकार सुरू असतील तर अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे.
अनधिकृत पार्किंग शुल्क आकारत असताना मी कर्मचार्यांना रंगेहाथ पकडले आहेत. सिडकोच्या परिवहन विभागातील संतोष महाले यांच्या नावाने हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात सखोल चौकशी होऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. -निलेश बाविस्कर, नगरसेवक, खारघर
संबंधित प्रकार चुकीचा आहे. अशाप्रकारे अनधिकृत पार्किंग शुल्क आकारणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची सुचना मी दिलेल्या आहेत. जोपर्यंत नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत या पार्किंग मधुन पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही. -गीता पिल्लई, वरिष्ठ अधिकारी, सिडको परिवहन विभाग
करार संपुष्टात आल्यानंतरही शुल्काची आकारणी
खारघर रेल्वे स्थानकामधील पार्किंगमध्ये चारचाकीवरून 11 रुपये प्रति चार तास, दुचाकीसाठी नऊ रुपये 12 तास पैशांची आकारणी केली जाते. पार्किंग शुल्क वसुलीचा टेंडर संपुष्ठात आल्यावर कोणत्या आधारावर सर्व सामान्य नागरिकांकडून पार्किंग शुल्क आकाराला जात आहे. याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.