Breaking News

पोलार्ड ठरला नवा ‘षटकार किंग’

सहा चेंडूंत लगावले सहा शानदार सिक्सर

अँटिग्वा : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात सुरू असणार्‍या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. विंडीजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. यासोबतच पोलार्डने हर्षल गिब्ज आणि युवराज सिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरू असतानाच पाचव्या षटकामध्ये हा पराक्रम करीत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने 11 चेंडूंमध्ये 38 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूंत सहा षटकारांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-20मधील विक्रमाशी बरोबरी केली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर एखाद्या खेळाडूला या विक्रमाशी बरोबरी करण्यात यश आले. गिब्सने एकदिवसीय सामन्यात हा विक्रम आपल्या नावे केला होता.
पोलार्ड मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला तेव्हा वेस्ट इंडिजचे चार फलंदाज तंबूत परतले होते. लेंडल सिमन्स 26 धावा, एविन लुईस 28 धावा यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर ख्रिस गेल आणि निकोलस पूरन भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर पोलार्डने वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून देत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करीत नऊ गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या संघाने 13.1 षटकांमध्येच सहा गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा करीत सामना चार गडी राखून जिंकला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply