Breaking News

औषध रॅकेटमधील आणखी पाच जणांना अटक

पनवेल : वार्ताहर

संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्‍या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून परराज्यातून आणखी काही व्यक्तींना अटक केली असली, तरी या रॅकेटमागचे मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, त्यामुळे या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना पकडण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर आहे.

संरक्षण दल अथवा शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत वितरित करण्यात येणारी काही औषधे ही सानपाडा येथील श्री समर्थ डिस्ट्रिब्युटर्स, तसेच तळोजा येथील मे. मेडलाईफ इंटरनॅशनल प्रा. लि. विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या दोन्ही एजन्सीच्या पेढीवर छापे मारून मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून सानपाडा व तळोजा पोलिसांनी दोन्ही औषध पेढीच्या चालक मालकांवर फसवणुकीसह, बनावटगिरी, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले.

त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महेश शिवशंकर नागणसुरे (36), सचिन विष्णू वडसकर (29) आणि सचिन पुरुषोत्तम बलदवा (37) या तिघांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा अधिक तपास करत पुण्यातून रॉयल फार्माचा निरजकुमार सिंग (26), दिल्लीतून विशाल फार्माचा संजय फत्तेचंद गर्ग (49), हरियाणा जमालपुरा येथील सतगुरू फार्माचा बिशनदास मदान (30) उत्तर प्रदेश आगरा येथील हिंदुस्थान मेडिकोचा हरप्रसाद श्यामबाबू गुप्ता (47) आणि आगरामधूनच शिवम अनिल गुप्ता या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या सगळ्यांची जामिनावर मुक्तता केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply