मुरूड ः प्रतिनिधी
शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची दखल घेत शेतकर्यांनी तातडीने अर्ज भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महापोर्टलवर फलोत्पादन योजनांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिग तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, डाळींब, मोसंबी, पेरू, सीताफळ तसेच इतर फळबाग योजना, सामायिक शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, प्रकिया संच, बैलचरित अवजारे, मनुष्य अवजारे, स्वयंचलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, रोटा वेटर आदी खरेदीसाठी नोंदणी करायची आहे. त्यासाठी 7/12 उतारा, 8 अ, बँक खाते पुस्तक, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सादर करून 31 मार्चअखेर फॉर्म सादर करून जास्तीत जास्त शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.