Breaking News

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायना दुसर्या फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था

भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने जिंकत आगेकूच केली आहे. दोघींनीही आपापले सामने सरळ दोन गेममध्ये जिंकत लय गवसली असल्याचे दाखवून दिले.

सिंधूने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या लयानी अलेसांदरा मेनाकी हिला अवघ्या 27 मिनिटांत 21-9, 21-7 असे सहज नमवत एकतर्फी विजय मिळवला. सिंधूने लयानीला सुरुवातीपासूनच डोके वर काढण्याची संधी दिली नाही. लयानीच्या चुकांचा फायदा उचलत सिंधूने गुणांची कमाई केली. त्यामुळे दोन्ही गेममध्ये सिंधूला प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही. दुसर्‍या गेममध्ये अधिक सफाईदार खेळ करीत सिंधूने पहिल्या फेरीचा अडसर सहज पार केला.

सायना नेहवालने इंडोनेशियाच्या युलिआ योसेफिन सुसांतो हिला 21-16, 21-11 असे दोन गेममध्ये सहज पराभूत केले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणार्‍या भारताच्या मुग्धा आग्रे हिची वाटचाल मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आली. तिला पोर्नपावीने दोन गेममध्ये 21-6, 21-8 असे सहज पराभूत केले.

पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने थायलंडच्या सुपन्यू अवहिंगसेनन याला 21-14, 21-6 असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली. एच. एस. प्रणॉयला प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या ब्राइस लेव्हरडेझने विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजवले. प्रणॉयला पहिल्या गेममध्ये धक्का बसल्यानंतर त्याने आपला खेळ उंचावत पुढील दोन्ही गेम जिंकून घेत सामना खिशात घातला. प्रणॉयने ही लढत 11-21, 21-16, 21-18 अशी जिंकली. पारुपल्ली कश्यपने डेन्मार्कच्या रासमस जेमके याला दोन गेममध्ये 21-19, 21-14 असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे.

भारताच्या बी. साईप्रणीथने अव्वल मानांकित जपानच्या केंटो मोमोटाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. साईप्रणीथने पहिला गेम 21-19 असा जिंकल्याने मोमोटा चकित झाला, मात्र दुसर्‍या गेममध्ये मोमोटाने स्वत:ला सावरत 21-14 अशी बाजी मारली. तिसर्‍या गेममध्ये अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली. अखेरीस मोमोटाने अफलातून खेळ करीत तिसरा गेम 22-20 असा जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. चिवट प्रतिकारानंतरही साईप्रणीथला स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली.

पुरुष दुहेरीत मात्र भारताच्या आशा संपुष्टात आल्या. मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या भारताच्या अव्वल जोडीला सिंगापूरच्या डॅनी बावा ख्रिसनांटा आणि कीन हीन लोह या जोडीने 21-13, 21-17 असे पराभूत केले.

मिश्र दुहेरीत, सौरभ शर्मा आणि अनुष्का पारख यांना थायलंडच्या जोडीने 21-12, 21-12 असे नमवले. प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने मिश्र दुहेरीत भारताच्याच अर्जुन एम. आर. आणि के. मनीषा या जोडीला पराभूत करीत दुसरी फेरी गाठली.

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply