शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आपला पोर्टफोलिओ बनवताना कंपन्यांच्या निवडीबाबतच्या काही निकषांबद्दल आपण मागील काही लेखांत पाहिले. आता अशा पोर्टफोलिओबाबत काय काळजी घ्यावयाची हे पाहू.
एकदा आपण मूलभूत विश्लेषणाचे विविध निकष लावून काही कंपन्या निवडल्या की पडत्या बाजारात टप्प्याटप्प्याने त्यांची खरेदी योजून ठेवावी ज्यासाठी आपणांस कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे चढ-उतार यांचा अभ्यास तांत्रिकी विश्लेषणाद्वारे करून कोणकोणत्या पातळीवर हा शेअर खरेदी करायचा हे नोंदवून ठेवा. आजकाल अनेक ब्रोकर्सकडील ट्रेडिंग सॉफ्टवेअरमध्ये अशा किमतींबद्दलचे अलर्ट लावून ठेवता येतात. त्यामुळे बाजार पडत असताना ज्या पातळीवर शेअर खरेदी करायचा ठरवलंय ती पातळी आल्यास आपल्या फोनवर मेसेज येतो. त्यामुळे लगेच आपण त्या भावात त्या शेअरची खरेदी करू शकतो, अगदी दिवसभर त्याकडे लक्ष न देतादेखील.
आता ह्या झाल्या खरेदीपूरक गोष्टी. यानंतरची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज आपण घेतलेल्या शेअर्सच्या भाव पातळ्या पाहत बसू नका. कारण एकूण बाजार जास्त घसरू शकतो आणि तुमच्या शेअरचा भाव कमी. त्यामुळे कदाचित अशा परिस्थितीत अधिक भीतीपोटी आपण आपले शेअर्स विकून टाकू शकतो. त्यामुळे जर आपण आपला पोर्टफोलिओ दीर्घावधीसाठी बनवत आहोत तर रोजच्या रोज शेअर्सच्या भावांचा आढावा घेत बसू नका.
तुलना नको : एकदा आपली शेअर्सची निवड अंतिम होऊन त्यामध्ये खरेदी झाल्यावर इतर दुसर्या कंपन्यांच्या शेअर्सच्या कामगिरीशी आपल्या पोर्टफोलिओच्या कामगिरीची तुलना करू नका. ज्याप्रमाणे पाणीपुरी कितीही स्वादिष्ट असली तरी ती रोजचे जेवण बनू शकत नाही आणि उत्तम आरोग्यासाठी चौरस आहारच अनिवार्य असतो, त्याप्रमाणे कमी कालावधीत अनेक कंपन्यांचे शेअर्स अनेकपट परतावा देऊन जातात, परंतु तसा परतावा ते देतीलच याची शाश्वती नसते आणि दीर्घकाळासाठी अशा कंपन्या तग धरतीलच याचीदेखील खात्री नसते. त्यामुळे आपले ते सोनुले आणि परक्याचे ते कार्ट हेच मनात ठेवून चला.
मंथन ः अनेक सट्टा मानसिकतेचे लोक दीर्घकाळासाठी बनवत असलेल्या र्टफोलिओमध्येदेखील ट्रेडिंगची संधी शोधत असतात. त्यांचे म्हणणे,‘नीचे में लेनेका और उपर में बेचनेका’. असे लोक दोन-चार वेळा 5-10% यातून कमावूनदेखील जातात, परंतु एखाद्या वेळी वरील भावात विकलेला शेअर पुन्हा कधीच त्या भावात मिळत नाही. त्यामुळे अशांना केवळ 5 ते 10 टक्क्यांवरच समाधान मानावे लागते आणि त्या विकलेल्या शेअरची किंमत पुढे जाऊन 10 पट अथवा 20 पट होते. त्यामुळे जर तुमची मानसिकता ट्रेडिंगची असेल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपले खाते उघडून एका ठिकाणी केवळ ट्रेडिंग करा, तर दुसर्या ठिकाणी केवळ दीर्घकालावधीसाठीचीच गुंतवणूक ठेवा.
लक्ष ठेवा ः आपला पोर्टफोलिओ अगदी रोजच्या रोज नाही तरी वर्षातून दोनदा तरी तपासून पाहा. हे तपासताना एकूण गुंतवणुकीवरील परतावा न तपासता प्रत्येक कंपनीचे निकाल तपासा. त्यांच्या अभ्यासातून कंपनीची प्रगती अथवा कंपनी संबंधित कोणती समस्या असल्यास तुम्हाला त्याचा अंदाज लावता येईल.
निर्णय ः तुम्ही निवडलेल्या कोणत्याही कंपनीत काही समस्या असल्यास कंपनीस वेळ द्या. कंपनीचे व्यवस्थापन अशा समस्यांचे निराकरण करण्यास किती सक्षम आहे त्याचा अंदाज घ्या आणि मगच त्या कंपनीचे शेअर्स विकण्याबाबतीत निर्णय घ्या. त्याचप्रमाणे दरमहा आपल्या पोर्टफोलिओच्या एकूण परताव्याची तुलना त्या प्रकारातील मापदंड असलेल्या निर्देशांकाशी करा. म्हणजे समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व कंपन्या या ब्लूचिप असल्यास त्यांचा परतावा निफ्टी 50 किंवा सेन्सेक्सशी पडताळून पाहा. जर तुमच्या पोर्टफोलिओत मिडकॅप कंपन्या अधिक असल्यास मिडकॅप निर्देशांबरोबर त्याची तुलना करत जा. जर दोन वर्षांनंतरदेखील तुमच्या पोर्टफोलिओचा परतावा हा त्या निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षा कमी असल्यास कोणत्या कंपनीच्या शेअर्समुळे आपल्या पोर्टफोलिओचा एकूण परतावा खालावतोय हे आधी तपासा. त्यानंतर त्या कंपनीबद्दल अधिक माहिती घेऊन तिचा अभ्यास करा आणि जर तुम्ही त्या कंपनीच्या बाबतीत खूप सकारात्मक असल्यास ती कंपनी पोर्टफोलिओमध्ये राहू द्या; अन्यथा पर्यायी तत्सम कंपनी निवडा.
पोर्टफोलिओ पुनर्संतुलन ः वर्षातून एकदा आपला पोर्टफोलिओ पुनर्संतुलित करा. (आदर्श म्हणजे 70-80% इक्विटी व 30-20% डेब्ट) म्हणजेच सुरुवातीस आठ लाख इक्विटी व दोन लाख डेब्टमध्ये गुंतवलेले असल्यास (80:20) आणि एका वर्षभरात इक्विटीमध्ये गुंतवलेल्या आठ लाखांचे 16 लाख झाले असतील व डेब्टमधील दोन लाखांचे दोन लाख 20 हजार झाले असतील तर एकूण रक्कम (16 लाख + 2.20 लाख = 18.2 लाख) पुन्हा संतुलित करा. त्यातील 80 टक्के म्हणजे 14.56 लाख पुन्हा इक्विटीमध्ये गुंतवा, तर 3.64 लाख डेब्ट प्रकारात (म्हणजेच अप्रत्यक्षपणे 16 लाखांपैकी 1.44 लाख तुम्ही सुरक्षित ठेवत असता).
शिस्तबद्धता ः आपण ठरवलेल्या गोष्टी जशाच्या तशा पाळत जा, मात्र सजगता दाखवून फाजिल आत्मविश्वासास फाटा द्या. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला पैशांनी आनंद आणि त्याबद्दलच्या योग्य निर्णयामुळे मानसिक समाधान देऊन जाईल हे नक्की.
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर
RamPrahar – The Panvel Daily Paper