Breaking News

रासायनिक कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ ः प्रतिनिधी
रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सकाळी अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल कंपनीमध्ये घडली. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ परिसर पुरता हादरून गेला होता. टाकीत असणार्‍या गॅसमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआयजवळील कंपनीत ही भीषण घटना घडली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.
तीन कामगारांचा मृत्यू होण्यामागे कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे याबाबत शोध सुरू आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास तीन तास त्यांचे सहकारी कामगार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना यश आले नाही. अखेरीस अंबरनाथ आणि एमआयडीसी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. एकूण पाच कामगार टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यापैकी दोघांनी आपला जीव वाचवत ते सुखरूप बाहेर पडले. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply