Breaking News

पंतप्रधान मोदींची जशोरेश्वरी मंदिरास भेट

इश्वरीपूर ः वृत्तसंस्था
 बांगलादेश दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 27) 51 शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौर्‍यानुसार मोदी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिरात पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर आहेत. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शनिवारी मोदींनी जशोरेश्वरी मंदिराला भेट दिली. बांगलादेशमध्ये मी जेव्हा 2015मध्ये आलो तेव्हा माँ भाग्यश्वरीच्या चरणांमध्ये लीन होण्याचे भाग्य मला मिळाले होते. आज मला माँ कालीचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले. माँ कालीचा अशीर्वाद आपल्यावर आहे. माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की, संपूर्ण मानवजातीला कोरोना संकटातून लवकरात लवकर मुक्त कर. सर्वे भवंतु सुखिनः जो मंत्र आपण जगत आलोय. वसुदैव कुटुंबकम हे आपले संस्कार असल्याने मी संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले.
भक्तांसाठी उभारणार कम्युनिटी हॉल
भक्तांच्या वापरासाठी आणि स्थानिकांनाही येथे धार्मिक कामासाठी कम्युनिटी हॉल गरजेचा आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा कम्युनिटी हॉल मदत केंद्र म्हणून वापरता येऊ शकतो. म्हणूनच भारत सरकार येथे हा हॉल उभारणार आहे, अशी घोषणाही मोदींनी केली.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply