Breaking News

चक्क रस्ता गेला चोरीला!

करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा मार्गाची नोंदच नाही

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून तो शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.

तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीत करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा ही गावे असून येथे सुमारे 500 लोकवस्ती आहे. मात्र ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या गावातील रस्त्यासाठी निधी मिळावा, यासाठी ग्रामस्थ अतोनात प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, करंबेली ठाकूरवाडी ते खडई या पाच किमी लांबीच्या रस्त्याची (क्रमांक 132) ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे नोंद नसल्याने प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या गावात मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ अंकुश माडे याने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर या रस्त्याबाबतची तक्रार केली होती. त्यावर कार्यकारी दंडाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता मार्ग क्रमांक 132 असून त्याची सरकार दप्तरी नोंद असल्याचे मान्य केले. मात्र खानाव ग्रामपंचायत आणि खालापूर पंचायत समिती यांच्याकडे या रस्त्याची नोंद नाही. त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून, तो शोधून द्याव व त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी (दि. 31) जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, खालापूर पंचायत समिती, खानाव आणि खरीवली ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत आमचा रस्ता शोधून द्यावा अन्यथा 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी संतोष घाटे, अंकुश माडे, शुभम माडे, सुनील घाटे, नारायण वीर, पांडुरंग घाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

करंबेली ते खडई धनगरवाडा हा पाच किमी लांबीचा रस्ता आहे. मात्र खानाव ग्रामपंचायत व खालापूर पंचायत समितीकडे या रस्त्याची नोंद नाही. आमचा रस्ता शोधून त्याला निधी द्यावा, अन्यथा 9एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

-संतोष घाटे, ग्रामस्थ,खडई धनगरवाडा, ता. खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply