राज्यात रस्ते बांधणासाठी 2780 कोटींचा निधी मंजूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामांसंदर्भात गुरुवारी (दि. 1) मोठी घोषणा केली. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरून सांगितले आहे. गडकरी यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये खास करून कोकणावासीयांसाठी अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी 11 ते सव्वा अकरादरम्यान केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये प्रगती का हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग 166 ई वरील गुहागर-चिपळूणला जोडणार्या रस्त्याचे काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरून सांगितले.
जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही गडकरींनी केली. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथानादरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी 228 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753च्या दोन पदरी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग 166 जी वरील रस्त्याच्या कामासाठी 167 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी, तसेच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 6 चा भाग असेल. आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रीय महामार्ग 361 एफच्या परळी- गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गडकरी यांनी जाहीर केलेली ही सर्व कामे महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे या माध्यमातून राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होईल, असे सांगितले जात आहे.