ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्या न्यूझीलंडच्या फिन अॅलनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. अॅलनचा फॉर्म आरबीसीसाठी उपयुक्त ठरू शकतो.
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्या ट्वेण्टी-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि 10-10 षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गुप्टील व फिन अॅलन यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 5.4 षटकांत 85 धावांची भागीदारी केली. गुप्टील 19 चेंडूंत एक चौकार व पाच षटकार खेचून 44 धावांवर माघारी परतला. त्यानंतर अॅलनने वादळी खेळी केली. अॅलनने 29 चेंडूंत 244.83च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार व तीन षटकारांसह 71 धावा कुटल्या.
न्यूझीलंडने 10 षटकांत 4 बाद 141 धावा चोपल्या होत्या. विजयासाठी विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सर्वबाद 76 धावा करता आल्या. न्यूझीलंडने सामना 65 धावांनी, तर मालिका 3-0ने जिंकली.