पनवेल : वार्ताहर
तौक्ते चक्रीवादळामध्ये जाहिरातीचा फलक मूळ स्ट्रक्चरसह खाली पडून त्या खाली झोपड्या दबल्याने, तसेच एक रिक्षा व मोटारसायकल दबल्याने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी पनवेल शहर पोलिसांनी मे. अलवेज अॅडव्हरटायझिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तौक्ते चक्रीवादळामध्ये जोरदार वाहणार्या वार्यामुळे गांधी हॉस्पिटलसमोरील इंदिरा नगर येथे आयटीआयजवळ असलेल्या मे. अलवेज अॅडव्हरटायझिंग या जाहिरातीच्या कंपनीचा होर्डिंग वार्यात हलत होता. त्या वेळी नगरसेवक राजू सोनी यांनी सर्तकता दाखवून पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कडू, शहर पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीने संपर्क साधून या घटनेची माहिती दिली होती. महापालिकेचे अधिकारी कडू व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी त्वरित पोहचून परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या जाहिरातीच्या कंपनीच्या होर्डिंगची देखभाल व दुरुस्ती न करता मानवी जिवीत तसेच इतरांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, असे हयगयीने कृत्य केल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले. हे स्ट्रक्चर मुळासकट नटबोल्ड तुटून बाजूला असलेल्या झोपड्या व वाहनांवर पडून त्यांचे नुकसान केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी परवेज एन. खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper