कर्जत : बातमीदार
तालुक्यातील साळोख-ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसातच उखडला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करत असून, संबंधीत अधिकार्यांनी पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वर्षोनुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या साळोख ओलमन- चेवणे या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक कोटी 40 लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच दोन कोटीचा नवीन निधीही मंजूर करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्ता दुरूस्तीच्या प्रत्यक्ष कामास सुरवातही करण्यात आली आहे. मात्र ओलमन ते तेलंगवाडी दरम्यान नवीन झालेल्या रस्त्यावरील खडी उखडल्याने खड्डे पडले आहेत. काही दिवसातच रस्ता खड्डेमय झाल्याने प्रवासी व वाहनचालक संताप व्यक्त करत असून, हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.
ओलमन-चेवणे या रस्त्याचा अडीच किलोमीटरचा भाग वनविभागाच्या जागेतून जात आहे. वनविभागाने ठेकेदारास काम थांबविण्यास सांगितले आहे. रस्ता तीव्र उताराचा असल्याने ट्रॅक्टर जाऊन तो उखडला आहे.
-दिनेश परदेशी, उपअभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना
ओलमन-चेवणे रस्ता वनविभागाच्या जागेतून गेला आहे, त्या भागातील काम थांबविण्यात आले आहे.
-निलेश भुजबळ, वनाधिकारी, कर्जत