पनवेल : वार्ताहर
राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूसंख्येतही भर पडली आहे. कोरोना लसीकरणाचे प्रमाणही वाढवले जात आहे, तळोजा कारागृहातील 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सहव्याधी 321 कैदी असून त्या कैद्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तळोजा कारागृह प्रशासनाने पनवेल महापालिकेबरोबर चर्चा केली असून लवकरच पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारागृहातील कैद्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
तळोजा कारागृहातील नवीन कैद्यांपासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नव्या कैदीची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. नवीन आलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे एखाद्या कैद्यांत वेगळी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्या कैद्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तळोजा कारागृह अधीक्षक यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष लक्ष दिले आहे. या कैद्यांमध्ये कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या कैद्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
तळोजा कारागृहातील 45 वर्षांपुढील कैद्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार कारागृहात 45 वर्षांपुढील 321 कैद्यांचे लसीकरण कारणात येणार आहे. कारागृहातील पात्र कैद्यांना लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नाव नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याने पात्र कैद्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून आधार कार्डची प्रत मागवून घेतल्यानंतर संकेतस्थळवर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या कैद्याना लसीकरण करण्यासाठी कारागृह प्रशासनाने पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाशी चर्चा करून यांना लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.