Breaking News

नालासोपार्‍यात मृत्यूचे तांडव!

सात कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

नालासोपारा ः प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची हेळसांड होत असून बेड, ऑक्सिजन, आयसीयू तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपार्‍यात घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे, तर भाजपने आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.
वसई विरारमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 11 रुग्णांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. यात नालासोपार्‍यातील विनायका हॉस्पिटलमध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
विनायका हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा साठा सोमवारी सायंकाळच्या सुमारास संपला होता. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देता आला नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला, मात्र रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
‘राज्य सरकारच्या अनास्थेचे बळी’
नालासोपार्‍यातील धक्कादायक घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपार्‍यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे. भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
केशव उपाध्ये म्हणाले, एकीकडे राज्यात करोनाने हाहाकार माजवला असून, दुसरीकडे राज्य सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश येत आहे. जेथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत अशा अनेक केंद्रांमध्ये रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचादेखील तुटवडा निर्माण झाला आहे. काल नऊ लोकं मृत्युमुखी पडणे हे खूप धक्कादायक आहे, अस्वस्थ करणारे आहे. भाजपचा असा आरोप आहे की हे कोरोनाचे जे बळी काल ऑक्सिजनअभावी गेलेत ते राज्य सरकारच्या अनास्थेपायी, राज्यातील महावसूली सरकारच्या दुर्लक्षातून व हेळसांडपणातून गेले आहेत. अजून नेमके किती बळी या सरकारला हवेत? हा खरेतर अत्यंत गंभीर प्रश्न आहे.
ही तर ठाकरे सरकारने केलेली हत्या!
मुंबई ः नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट करीत नालासोपार्‍यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील विनायक हॉस्पिटलमध्ये सोमवारी एकाच दिवशी सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, पण हे मृत्यू हॉस्पिटलमधील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रुटीमुळे झाले आहेत. त्यामुळे हे मृत्यू नसून ठाकरे सरकारने केलेली हत्या आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply