आमदार रविशेठ पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
पेण : प्रतिनिधी
पेणमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, या रुग्णांना जलद औषधोपचार व ऑक्सिजन बेडची सेवा मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पेणमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, अशी वस्तुस्थिती आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व अनुभवी डॉक्टर (फिजिशियन) वर्गाची कमतरता आहे. परिणामी येथील रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता नातेवाईकांची फरफट होत आहे.
करोनाच्या पहिल्या टप्पात काही लोकांच्या नोकर्या गेल्या असून, आता ते तुटपुंज्या वेतनावर उद्योगधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशातच जर घरातील दोन ते तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या तर खाजगी रुग्णालयात उपचारा करीता येणारा खर्च त्यांना परवडणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
राज्य शासनाने यात युद्धपातळीवर लक्ष घालून पेण उपजिल्हा रुग्णालयात 200 ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व डॉक्टर तसेच इतर सेवा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी या निवेदनाच्या शेवटी केली आहे.