नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरात (यूएई)पाठोपाठ रशियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात पंतप्रधान मोदींनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.
रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या पुरस्काराची घोषणा केली. रशियाचा हा सर्वोच्च पुरस्कार असून, 1698 पासून तो दिला जातो. सोव्हियत शासनाच्या काळात हा पुरस्कार देणे बंद करण्यात आले होते, मात्र 1998पासून पुन्हा हा पुरस्कार देण्यात येत आहे.
यूएईने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले होते. दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यात मोदींनी अभूतपूर्व कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे यूएईने म्हटले होते. त्याआधीही दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.