Breaking News

घातक राजकारण

श्रेयवादाच्या लढाईमध्ये इतकी सवंग पातळी आजवर कुणी गाठली नसेल. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्‍या कंपनीला आपल्याकडील साठा महाराष्ट्राच्या जनतेसाठीच उपलब्ध करून द्यायचा होता. त्यांची चूक एवढीच की या कामासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली. महाविकास आघाडीचे दुखणे नेमके हेच आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा या तिन्ही प्रकारच्या पुरवठ्यांवरून गेले काही दिवस सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधक यांच्यामध्ये जबरदस्त हमरीतुमरी सुरू आहे. या वादावादीने शनिवारी रात्री नवी पातळी गाठली. रेमडेसिवीर इंजेक्शनची साठेबाजी केल्याच्या संशयावरून दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डोकानिया यांची चौकशी सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड हे बीकेसी पोलीस ठाण्यात धडकले. फडणवीस यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतल्याची व्हिडिओफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. वास्तविक ब्रुक फार्मा ही कंपनी त्यांच्याकडे असलेला रेमडेसिवीरचा साठा भारतीय जनता पक्षाला सुपुर्द करणार होती व तोच साठा भाजपतर्फे राज्य सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार होता. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी काढण्यात येणार होती. भाजप नेत्यांनी उग्रावतार धारण केल्यानंतर, डोकानिया यांना फक्त चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले होते, अशी सारवासारव पोलिसांतर्फे करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाबरोबरच राज्य सरकार तसेच दीव-दमण प्रशासन यांच्या सर्व आवश्यक परवानग्या या व्यवहारासाठी मिळाल्या होत्या. त्याची कागदपत्रे फडणवीस यांनी पोलिसांसमोर ठेवली. तरीही महाविकास आघाडी सरकारने या लोककल्याणाच्या कामामध्ये अडसर घातला आणि त्यासाठी सत्ताबळाचा वापर केला. गेले काही दिवस महाविकास आघाडी सरकारमधील नेते ताळतंत्र सोडून वाट्टेल तसे आरोप केंद्र सरकारवर करीत आहेत. स्वत:च्या दारुण अपयशावर पांघरुण घालण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न मानावा लागेल. महाराष्ट्राला जास्तीत जास्त रेमडेसिवीर पुरवण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनीदेखील नि:संदिग्धपणे दिल्या आहेत. राज्यात आज ऑक्सिजनचादेखील प्रचंड तुटवडा आहे व प्राणवायुअभावी रुग्ण एका इस्पितळाकडून दुसर्‍या इस्पितळाकडे प्राणांतिक धावाधाव करत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी राज्य सरकारने महिनाभरापूर्वीच पावले उचलायला हवी होती. कारण कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी अंगावर येणार याचा अंदाज तज्ज्ञांना तेव्हा आला होता, पण तेव्हा हे सरकार आयत्या मिळालेल्या खुर्चीत गाढ झोपी गेले होते. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्वत: लक्ष घालून विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून महाराष्ट्रात आणणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस सोडण्याची घोषणा रविवारी केली. केंद्र सरकारचे धोरण खरोखरच राजकारणाच्या पलिकडे जाऊन संकटातील राज्यांना मदत करण्याचे आहे हेच यातून दिसून येते. लसींचा पुरवठा हळूहळू सुरळीत होऊ लागला आहे. रेमडेसिवीरचा पुरवठादेखील येत्या तीन-चार दिवसांत नीट होईल आणि येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरजदेखील तूर्तास भागेल असे दिसते. हे सारे केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय घडूच शकले नसते. असे असताना महाविकास आघाडीचे नेते श्रेयवादाचे सवंग आणि लज्जास्पद राजकारण करत आहेत. हे निषेधार्ह तर आहेच, परंतु घातकदेखील आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply