Breaking News

नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती

25 रुग्णांचा करुण अंत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना येथे घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आणखी 25 रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने नाशिकमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डी. के. बालुजा यांनी सांगितले.
सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याची माहितीही रुग्णालयाने दिली. सध्या 200 रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 350 रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ 25 मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला आठ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ 500 लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ 12 तासच पुरेल इतका साठा असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply