Breaking News

प्याद्यांनीच का मरावे…

बुद्धिबळातील प्याद्यांसारखीच मनसे, शेकाप कार्यकर्त्यांची स्थिती आहे. नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार राजकीय पटलांवर इकडून तिकडे उड्या मारत स्वार्थ साधत असतात आणि संघर्षाची वेळ आलीच, तर आपल्यापुढे असणार्‍या निष्ठावंतरूपी प्याद्यांना पुढे करून त्यांचा बळी देतात. राजकारणात असे प्यादे होऊन मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा एवढेच सांगणे आहे सर्व निष्ठावंतरूपी प्याद्यांना.

64 घरांच्या बुद्धिबळाची मजा काही औरच आहे. दोघांमध्येच खेळल्या जाणार्‍या या खेळात पटावरील काळ्या, पांढर्‍या रंगातील 32 सोंगट्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येकाची चालही वेगवेगळी आहे. राजाला साथ देण्यासाठी वजीर असतो. तो कसाही, कुठेही चालतो, तर उंट तिरप्या चालीत पटावर घुमत असतो. हत्ती महाराज उभे, आडवे फिरत असतात, तर धूर्त घोडा अडीच घरेच उड्या मारताना दिसतो. फक्त या सर्वांचे रक्षण करणारी आठ प्यादी मात्र एकच घर ओलांडत असतात आणि अनेकदा याच प्याद्यांचा बळीही दिला जातो अथवा ती प्यादी आपल्या चालीने मरणही पावतात. हे खेळाचे सूत्र प्रत्यक्षात मानवी जीवनाशी निगडित असेच आहे. कारण प्रत्येकाचे जीवन हे बुद्धिबळाच्या पटासारखेच असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी अथवा जीव वाचविण्यासाठी आपल्या समोरच्या प्याद्यांचा जीव देताना दिसतो. सध्या देशभरात निवडणुकीचा माहोल सुरू आहे. राजकीय पटलावर देखील बुद्धिबळासारख्या चाली खेळताना राजकारणी मंडळी असतात.स्वार्थासाठी कशाही प्रकारे प्यादेरूपी कार्यकर्त्याचा वापर करताना दिसतात. अनेकदा कार्यकर्ता म्हणजे कढीपत्त्यासारखा असतो असे उपहासाने बोलले जाते. ज्या वेळी फोडणी टाकायची वेळ येते तेव्हा प्रथम कार्यकर्तारूपी कढीपत्त्याचा नेतेमंडळी उपयोग करून घेतात आणि प्रत्यक्षात ज्या वेळी खायची वेळ येते त्या वेळी याच कढीपत्तारूपी कार्यकर्त्याला बाहेर फेकले जाते.हे अनेकदा आपण पाहत आलेलो आहोत.

आतासुद्धा अनेक छोटे प्रादेशिक पक्ष कार्यकर्ता रूपी प्याद्याचा बळी देऊन आपला राजकीय स्वार्थ साधताना दिसतात. गेल्याच आठवड्यात मुंबईत गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली.राज हे उत्तम वक्ते आहेत. बोलणेही फर्डा आहे, पण त्यांनी या वेळी चक्क काँग्रेसला, राष्ट्रवादीला मतदान करा, असे निर्देश मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या निवडणुकीत याच राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी  यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज असल्याचे सांगितले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले किती भ्रष्ट आहेत याचा पाढाही राज ठाकरे यांनी वाचला होता, पण आता राज यांना काँग्रेसवाले प्रिय वाटू लागलेत. राहुल गांधी पंतप्रधान झाले, तर चालतील असेही त्यांनी जाहीर करून एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुराच आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी राज यांची ही राजकीय चाल आहे. त्यामुळेच ते आपल्या कार्यकर्तारूपी प्याद्यांचा बळी देऊन आपला राजकीय स्वार्थ साधताना दिसत आहेत. कारण याच प्याद्यांच्या जोरावर सन 2009 मध्ये राज ठाकरे यांनी पहिल्याच दणक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आणले होते, पण नंतर त्या पक्षाची उडालेली दाणादाण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. आता या निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे.  कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात प्रचार केला होता आणि आता त्याच कार्यकर्त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करा, असे सांगण्याची दुर्धर वेळ आली आहे. म्हणजे असे सांगताना मतदारांकडून कार्यकर्ता रूपी प्याद्याचा बळी गेला तरी हरकत नाही असेच राज यांचे वर्तन आहे, असेच खेदाने नमूद करावे लागेल. राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडविणार्‍या अनेक पोस्ट व्हायलर झालेल्या आहेत. त्यात भले भले राजकीय विचारवंत होऊन गेले, परंतु आजपर्यंत एकाही विचारवंतांच्या डोक्यात ही संकल्पना आली नाही की कोणीही मांडली नाही… ती संकल्पना राजसाहेबांनी सत्यात उतरवली आहे… ती म्हणजे… सगळा पक्षच प्रचारासाठी भाड्याने मिळेल…  मालकासकट! ही पोस्ट खूपच बोलकी आणि वास्तवता दाखविणारी आहे.

-अतुल गुळवणी (9270925201)

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply