आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र उत्साह संचारला होता. राज्यातील युवावर्गाने लसीकरणाची तयारीही केली होती, मात्र राज्यात या वर्गासाठी 1 मेपासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झाल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, 18 ते 44 वयोगटासाठ ी1 मे रोजी राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझे आवाहन आहे की, आता समजुतदारीने काम घ्यावे लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणे सक्तीचे आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये.
नव्या टप्प्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. पाच कोटी 71 लाख लोकांना लसीकरण करायचे आहे. त्यामुळे एका वेळेस सर्वांना लसीकरण करणे शक्य होणार नाही. आधी आरोग्य कमिटी बनवली जाईल. त्यांच्या निर्देशानुसार मायक्रो प्लॅनिंग केले जाईल आणि मग लसीकरण केले जाईल. 18 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 44 अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. 35 ते 44 हा गट आधी घेता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. यातील सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावरदेखील विचार सुरू आहे. 18 ते 44 वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि 45 वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील, असेही टोपेंनी सांगितले.