कर्जत : बातमीदार
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नेरळ पोलिसांनकडून आता शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्ते व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यात नेरळ शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होतानाचे चित्र समोर आले होते. सोनसाखळी चोरी बरोबरच वाहन चोरी तसेच वाहनाचे किमती सामान चोरीला जाणे अशा प्रकारच्या घटना होत होत्या. घरे व मंदिरांचे लक्षदेखील चोरांकडून होताना दिसत होते. नेरळला लागून असणार्या कर्जत-कल्याण राज्यमार्गावर वाहन अपघातांच्या घटनांत वाढ झाली होती. वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होत आहे. नेरळ शहराला लागून असणार्या ममदापुर ग्रामपंचायत हद्दीत एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा घडला होता.
या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तानाजी नारनवर यांनी भर दिला आहे.
सध्या राज्यात लॉकडाऊन लागू आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. हे नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील आहेत. हे नियम तोडणार्यांवर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवणे पोलिसांना श्यक्य होणार आहे.
नेरळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची ही तिसरी नजर किती प्रभावी ठरणार आहे, हे पाहणेदेखील आता महत्वाचं ठरणार आहे.