दिल्लीच्या तख्ताचे स्वयंवर जाहीर झाले. दिल्लीश्वरांच्या तख्ताच्या रूपाचे गोडवे ऐकून अनेकांची झोप उडाली. ’ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ अशी सगळ्यांची अवस्था झाली. तख्ताचे वर्णन ऐकूनच पागल झालेले भारत देशीतील राजे-रजवाडे, वतनदार, सेनापती आणि उद्योगपती ’चला राघवा चला, पाहावया जनकाची मिथिला’ म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. प्रत्येक जण दिल्लीचे तख्त आपल्यालाच वरमाला घालणार म्हणून खुशीने गाजरे खाऊ लागले. रयतेला खूश करण्यासाठी प्रलोभने दाखवू लागले. दिल्लीच्या या स्वयंवराला प्रवेश मिळण्यासाठी असलेल्या अटी ऐकून अनेकांनी आपली घरवालीच बरी म्हणत माघार घेतली.
आपल्या महाराष्ट्र देशी असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या सुभेदारांच्यात ही स्वयंवराची बातमी पसरताच ’सांगू किती आज आनंदी आनंद झाला’ म्हणत जल्लोष सुरू झाला. बारामतीच्या काकांनी ’परदेसी परदेसी’ म्हटल्यामुळे यापूर्वी त्यांना स्वयंवरात प्रवेश मिळाला नव्हता म्हणून त्यांनी या वेळी ’परदेसी, परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के… परदेसी मेरे यारा, वादा निभाना मुझे याद रखना, कहीं भूल ना जाना’ म्हणत नाचायला सुरुवात केली. नांदेडकरांनी मात्र बारामतीकरांना
’बेवफा, बेवफा, बेवफा है तू’ म्हणत हिणावयाला सुरुवात केली. अखेर पप्पूला स्वयंवराला जाता यावे यासाठी काकांशी जुळवून घेण्याचे आदेश आल्याने ’भूल गया सबकुछ हम्म, याद नहीं अब कुछ, ओ हो, हम्म हम्म’ म्हणत नांदेडकरांनी घड्याळ हातात घेऊन ’चार दिनोका प्यार है रब्बा’ म्हणत भांगडा नाचायला सुरुवात केली.
दिल्लीच्या तख्तावर पुन्हा नरेंद्रांनाच स्वयंवराला जाता आले पाहिजे यासाठी अमितजींनी नरेंद्रावीण तख्तावरी कोण बैसतो? म्हणत देवेंद्रना सांगितले, महाराष्ट्र देशी आता धनुष्य हाती घेऊन श्री रामाचे नाम गात या नरेंद्रना पार करा. बारामती आणि नांदेडच्या साम्राज्याचा सूड घ्या. असे म्हणताच देवेंद्रांनी दाटला चोहीकडे अंधार, थांब उद्धवा, थांब म्हणत मातोश्रीवर पोहचून नको रे जाऊ उद्धवा, उगा का काळीज माझे उले, म्हणत विनवणी करू लागले. नरेंद्रांचे नाम घेत सूड घेऊया अशोकवनी म्हणू लागताच उद्धवाने सन्मित्र देवेंद्रांचा उद्धव आज झाला म्हणत त्यांच्या हाती धनुष्य देऊनी कमळ आपल्या हाती घेतले. कुणी गोविंद घ्या, कुणी राम घ्या, म्हणत सुभेदारांची वाटणी झाली. ते पाहून मराठी रयतेला आनंद झाला.
महाराष्ट्र देशी आज काळ कठीण पातला, मज सांगा काका जाऊ कोठे? दाटला चोहीकडे अंधार, म्हणत आघाडीच्या बँड पथकात इंजीन दाखल झाल्याचा खलिता आला. या इंजिनाला इंधनाचा पुरवठा बारामतीच्या पंपावरून होणार असल्याची माहिती मिळाली. काका पुतण्याच्या हट्टाने आधीच त्रस्त झाले होते. त्यातच पौत्री सुप्रियाही संकटात होती. त्यामुळे ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ आळवत होते. मावळमध्ये पार्थने बालहट्ट धरल्याने काकांनी ’पार्था हे साहस असले, तुज मुळी न शोभले’ म्हणायला सुरुवात केली. काकांची ही अवस्था पाहिल्यावर इंजिनाने ‘मागणे हे एक काका आपुल्या द्या पादुका, सूड घ्या त्या दिल्लीपतीचा’ म्हणत महाराष्ट्र देशी पदक्रमणा सुरू करताच ’रताळ्याला म्हणतंय केळ अन् दुसर्याच्या लग्नात नाचताय खूळ’ म्हणून देवेंद्रांनी इंजिनाची फिरकी घेतली. स्वयंवराला आता कोठे सुरुवात होत असल्याने आणखी काही दिवस तख्तयान असेच सुरू राहणार आहे.
-नितीन देशमुख (7875035636)