50 लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस युकेला पाठवण्याचा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसेच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेर्यानंतरही केंद्र सरकारने सीरमची विनंती फेटाळून लावली आहे.
भारताला सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही जबर धक्का बसला आहे. यामुळे देशात निर्माण होणार्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सीरमला परवानगी नाकारण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल आता बदलावे लागणार आहेत.