पनवेल : वार्ताहर
रेल्वेतून प्रवाश्यांचे मोबाइल चोरणार्या सराईत मोबाइल चोरट्यास वाशी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 41,500 रुपयांचे तीन मोबाइल हस्तगत केले आहेत.
मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना (वय 22) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील नागपाडा येथील मदनपुरा येथील रहिवाशी आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाइल चोरीचे गुन्हे घडत असल्याने यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून वाशी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सुचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने वाशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय टेळकीकर व गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफ पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना, एक व्यक्ती मानखुर्द परिसरात चोरीचे मोबाइल फोन विकण्यास आला आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मानखुर्द येथे जाऊन उपरोक्त आरोपीस ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना असे असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीमधून पोलिसांना 41,500 रुपयांचे तीन मोबाइल फोन मिळून आले. हे मोबाइल फोन त्याने जुईनगर व सानपाडा इत्यादी ठिकाणाहून त्याने रेल्वेतून चोरी केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.
वाशी रेल्वे पोलीस ठाणे येथे याप्रकरणी गुन्हे दाखल असून याबाबत उपरोक्त आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपी हा वडाळा व सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेला होता.