Breaking News

तौक्ते चक्रीवादळाचा रायगडला तडाखा

तीन बळी, घरांची पडझड, वृक्ष पडले, बत्ती गूल

अलिबाग, उरण ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी (दि. 17) मध्यरात्री रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. यामध्ये एक हजार 105 घरांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आहेत. उरणमध्ये वादळी पावसात भिंत कोसळून दोन महिलांचा, तर पेणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वेगवान वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने अडचणींमध्ये भर पडल्याचे दिसून आले.
वादळी पावसामुळे जिल्ह्यातील एक हजार 104 घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. उरणमध्ये मंदिराची भिंत कोसळून सुगंधा भीमनाथ घरत (वय 67, रा. नागाव, उरण) आणि नीता भालचंद्र नाईक (55, आवेडा, उरण) यांचा मृत्यू झाला, तर पेण गागोदे बुद्रुक येथील रामा बाळू कातकरी (80) झाडाची फांदी अंगावर पडून मयत झाले आहेत. त्यांची पत्नी सिमी कातकरी (70) जखमी झाल्या आहेत.
उरणमध्ये भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू
उरण ः रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, उरण बाजारपेठेत भिंत अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 17) घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
उरण बाजारपेठेतील गणपती चौकासमोरील बाजूस श्रीराम मंदिराचे काम सुरू होते. शहरात रविवारपासूनच चक्रीवादळ व मुसळधार पाऊस सुरु होता. श्रीराम मंदिराच्या खालील बाजूस सुगंधा (देऊबाई) भीमनाथ घरत (वय 67, रा. नागाव, उरण) ही महिला भाजी विकण्याचा व्यवसाय करीत होती. सोमवारी सकाळच्या वेळी केगाव ग्रामपंचायत हद्दीतील आवेडा येथील नीता भालचंद्र नाईक (वय 55) भाजी खरेदी करीत असताना मंदिरावरील भिंत दोघींच्या अंगावर कोसळली. यात नीता नाईक यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता, त्यांचा मृत्यू झाला, तर सुगंधाबाई घरत यांच्याही डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांना पनवेलच्या खांदा कॉलनी येथील अष्टविनायक रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नवी मुंबईत एक मृत्युमुखी
नवी मुंबई : चक्रीवादळामुळे रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वार्‍यात सानपाडा येथे पाम बीच रोडवर विजेचा खांब पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशाल नरळकर (35) असे या तरुणाचे नाव असून, तो रात्री 10 वाजता सहकार्‍यासह कामावरून ऐरोलीला घरी परतत होता. हे दोघे दुचाकीने येत असताना विजेचा खांब अचानक पडून जखमी झाले. यात विशालचा मृत्यू झाला, तर स्वप्नील राठोड जखमी झाला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply